राज्यात आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्रौत्सवाला उत्साहाने प्रारंभ झाला. आजपासून पुढचे नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांचं पूजन केलं जाईल. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका या साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ झाला. याशिवाय राज्यात इतरत्रही देवी मंदिरांमधे उत्सव सुरु झाला. मुंबईतही मुंबादेवी आणि महालक्ष्मी यांच्या मंदिरांमध्ये या उत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी घटस्थापना करुन भाविक देवीचं पूजन करीत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नदुर्ग किल्ल्यावरची श्री भगवती देवी, आडिवऱ्याची महाकाली, दाभोळची चंडिका देवी, चिपळूणची विंध्यवासिनी अशा पुरातन मंदिरांसह जिल्ह्यातल्या देवीच्या अन्य मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज अनेक मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. छत्रपती संभाजीनगरात कर्णपुरा इथल्या तुळजाभवानी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. धुळे शहरातल्या एकविरा माता मंदिरात देखील नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नागपुरातही कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबेच्या मंदिरात नवरात्रौत्सवाला आज मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरुवात झाली.
नवरात्रौत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.