मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते. मारकडवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर प्रशासनानं आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही, असंही ते म्हणाले. मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी गावोगावी ठराव घेण्याची सूचना त्यांनी दिली. लोकशाही टिकविण्यासाठी ईव्हीएम मशीन नको ही चळवळ अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
मारकडवाडी इथल्या ईव्हीएम यंत्रात बिघाड झालेला असू शकतो, मात्र सर्वच ईव्हीएम खराब आहेत, असा याचा अर्थ होत नाही. गावकऱ्यांच्या या संदर्भातल्या शंका निवडणूक आयोगानं दूर करायला हव्यात, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नाशिकमध्ये मांडलं. विरोधकांना कमी मतं का मिळाली याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावं, याचं खापर ईव्हीएमवर फोडू नये, असंही आठवले यांनी नमूद केलं.