राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. संपूर्ण बदल करण्याची ताकद ज्यांच्यात आहे, त्यांना बळ दिलं पाहिजे. त्यासाठी महाविकास आघाडी हा पर्याय आहे, असं माजी मुख्यमंत्री शरद पवार आज म्हणाले. बारामतीमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या सामुदायिक परिवर्तनाने आपण परिवर्तन आणू शकतो आणि चित्र बदलू शकतो, असं ते म्हणाले.
सध्या राज्यातली आणि देशातली आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. काही महत्त्वाचे प्रश्न हाताळण्यात राज्यकर्त्यांना अपयश आलं आहे. केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्या मंत्रालयाने रँकिंग केलं आहे. जे राज्य पहिल्या नंबरवर होतं त्याचा नंबर पहिल्या पाचमध्ये नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.
विधानसभा निवडणुकीसाठी विमानाने AB फॉर्म पोहोचवला, असं अनेक जिल्ह्यातून ऐकतोय. सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना अर्थ सहाय्य दिलं जातंय. त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात असा आरोप त्यांनी केला.