‘भारतपोल’ पोर्टल आणि तीन नवीन फौजदारी कायदे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मजबूत यंत्रणा म्हणून काम करतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं सीबीआयनं विकसित केलेल्या ‘भारतपोल’ पोर्टलचं उदघाटन करताना बोलत होते. हे पोर्टल तपास यंत्रणा आणि सर्व राज्यांच्या पोलिसांना १९५ देशांच्या इंटरपोल नेटवर्कशी जोडून गुन्हेगारीचं नियंत्रण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असं ते यावेळी म्हणाले.
आतापर्यंत भारतात गुन्हे करून इतर देशांमध्ये आश्रय घेणारे गुन्हेगार भारतीय न्याय यंत्रणेच्या कचाट्यात सापडत नव्हते. मात्र, भारतपोलसारख्या आधुनिक यंत्रणेच्या अंमलबजावणीमुळे त्यांना आपल्या कायद्यांच्या कक्षेत आणता येईल, असं ते म्हणाले.
भारतपोल पोर्टल जागतिक नेटवर्कच्या माध्यमातून रेड कॉर्नर नोटीस आणि इतर अलर्ट जारी करण्यासह अद्ययावत माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विनंत्यांना लक्षणीय प्रतिसाद देईल असं त्यांनी सांगितलं. भारतपोल, कनेक्ट, इंटरपोल नोटिस, संदर्भ, प्रसारण आणि संसाधनं, ही पाच प्रमुख मॉड्यूल कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संस्थांना प्रतिसाद देण्यासाठी एक तांत्रिक मंच प्रदान करतील, असं अमित शाह यांनी सांगितलं.