बिहार, झारखंड, ईशान्य मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड आणि उत्तराखंडमधल्या तुरळक भागात पुढील दोन दिवसांत उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या बहुतांश भागातही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात मंगळवारपर्यंत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. पंजाबमधल्या गुरुदासपूर इथं काल, सर्वाधिक कमाल तापमान ४६ पूर्णांक ५ अंश सेल्सिअस इतकं नोंदवले गेले.
दरम्यान, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये येत्या १९ ते २१ जून दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.