उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणात रस्ते वाहतूक संथ गतीनं सुरू असून प्रवाशांना दाट धुक्यातून मार्ग काढावा लागत आहे. कमी दृश्यमानतेमुळे रेल्वेसेवेवर देखील परिणाम झाला असून दिल्लीकडे जाणाऱ्या ४९ गाड्या चार तास विलंबानं धावत आहेत. दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवाही काही अंशी विस्कळीत झाली आहे. येत्या दोन दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात काही भागांत दाट धुकं आणि थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पुढील दोन दिवसात दाट धुक्याची शक्यता आहे तर जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद मध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातही उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.