ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्याने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेले काही दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर परभणी इथल्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळणारे बोराडे यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह १९६२ साली पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला होता. त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या होत्या. ग्रामीण भागातल्या गरीब सर्वसामान्य माणसाला त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केलं. त्यांच्या कथांमधली पात्रं ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. त्यांच्या कादंबऱ्यांवरचे चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत.
पाचोळा या कादंबरीसाठी तसंच मळणी या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्गमय निर्मितीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात राज्य शासनाने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ही बोराडे यांना जाहीर केला होता. बोराडे यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
Site Admin | February 11, 2025 1:10 PM | ज्येष्ठ साहित्यिक | निधन | रा रं बोराडे
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं निधन
