डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं आज नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. श्वासलिकेत संसर्ग झाल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. मागच्या पाच दिवसांपासून त्यांना जीवरक्षण प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. आज दुपारी तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

 

येचुरी यांचं पार्थिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात शनिवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर येचुरी यांचा देह रुग्णालयाला दान केला जाणार आहे.

 

येचुरी यांच्या निधनाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येचुरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. विद्यार्थी राजकारण, राष्ट्रीय राजकारण आणि संसदेत येचुरी हे एक प्रभावी आवाज म्हणून कार्यरत होते. आपल्या विचारसरणीशी बांधिलकी असूनही त्यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर, सीताराम येचुरी म्हणजे डाव्या चळवळीला वाट दाखवणारा दिवा होता, राजकीय परीघाच्या पलीकडे संवाद साधण्याची क्षमता त्यांच्याकडे होती, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

 

येचुरी यांच्या निधनानं राजकीय क्षेत्राची हानी झाली असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. येचुरी हे एक अनुभवी नेते होते, विद्वत्ता आणि वक्तृत्वासाठी ते ओळखले जात असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटल आहे. तर येचुरी यांचं सार्वजनिक आयुष्यातलं योगदान कायम स्मरणात राहिल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 

 

सीताराम येचुरी हे आयडीया ऑफ इंडियाचे संरक्षक होते, त्यांना देशाची सखोल समज होती, असं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

 

येचुरी हे देशातल्या डाव्या पक्षांतील महत्वाचा आवाज होते, श्रमिक, कामगार आणि शेतकऱ्यांचा आवाज येचुरी यांच्या जाण्यानं हरपला आहे, अशी भावना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 

 

येचुरी यांची पक्षनिष्ठा आणि विचारांशी असणारी बांधिलकी ही राजकारणाच्या क्षेत्रात आदर्श बाब आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

 

भाकपचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो आणि भाकप नेते राजन क्षीरसागर यांनीही येचुरी यांच्या डाव्या चळवळीतल्या योगदानाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा