झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराकरता उद्याचा एकच दिवस उरला असल्यानं सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते मतदारांपर्यंत पोहोचून आपापल्या उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रांची इथं रोड शो केला. तसंच, गुमला आणि बोकारो इथं जाहीर सभांना संबोधित केलं. भाजपानं कायमच आदिवासींचं हित आणि कल्याणाची काळजी घेतली, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोकारो इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधित करताना म्हणाले. गेल्या दहा वर्षांत भाजपा सरकारनं काँग्रेसपेक्षा चारपट जास्त तीन लाख कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला असं ते म्हणाले.
सोरेन यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं झारखंडची लूट केली मात्र आम्ही इथल्या जनतेला शिक्षण, घरं, रोजगार यासारख्या सुविधा पुरवू असं त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झाल्यावर भ्रष्टाचाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
भाजपाचे नेते आणि मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही प्रचारसभा घेतली. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही रांचीमधल्या प्रचारसभेला संबोधित केलं. केंद्रीय यंत्रणांचा भाजपाकडून कशाप्रकारे गैरवापर केला जातोय, यावर जनतेचं बारकाईनं लक्ष असून आगामी निवडणुकीत जनता त्याबाबत भाजपाला चोख प्रत्त्युतर देईल, असंही ते म्हणाले.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी कोडरमा इथं प्रचारसभा घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला. झारखंडच्या विकासासाठी इंडिया आघाडीला मत द्यावं असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर पक्षांच्या नेत्यांनीही राज्यभर प्रचारसभा आणि रोड शो केले.
लोजपा – आर चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी पलामू इथं घेतलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला.