केंद्रीय विधि आणि न्याय मंत्रालयाच्या वतीनं ‘हमारा संविधान हमारा सन्मान’ या उपक्रमाच्या प्रादेशिक स्तरावरील दुसरा कार्यक्रम येत्या १६ जुलै २०२४ रोजी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं होणार आहे. भारतीय राज्यघटना आणि भारताचा प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केल्याच्या घटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम होईल. यावेळी ‘हमारा संविधान हमारा सन्मान’ या पोर्टलचा प्रारंभही केला जाईल, तसंच मायगव्ह या डिजीटल व्यासपीठावरून जानेवारी ते एप्रिल या कालावधीत झालेल्या संविधान विषयक प्रश्नमंजुषा, पंच प्रण रंगोत्सव, आणि पंच प्रण अनुभव या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ देखील होईल. या कार्यक्रमालाच धरून समांतरपणे सबको न्याय हर घर न्याय, नव भारत नव संकल्प आणि विधी जागृती अभियान यांसारखे उपक्रमही राबवले जाणार आहेत.
नागरिकांमध्ये राज्यघटनेविषयीची समज वाढावी, कायदेशीर हक्कांविषयीची जागरूकता रुजावी या हेतूनं याच वर्षी जानेवारी महिन्यात या अभियानाची सुरूवात केली गेली होती.