१८व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा तिसरा दिवस अनेक चित्रपट, माहितीपट, लघुपटांच्या प्रदर्शनांनी उत्साहात पार पडला. मिफमध्ये आज प्रतिष्ठेच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेल्या काही वर्षांत निवडल्या गेलेल्या काही निवडक चित्रपटांसोबत रशिया, इराण, इटली इत्यादी देशांचे, तसंच भारतीय लघुपट, माहितीपट आणि ऍनिमेशनपट, ऑस्करसाठी निवडलेले लघुपट दाखवले आहेत.
याअंतर्गत, २०२०मध्ये बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवलेल्या ‘गुमनाम दिन’ हा लघुपटाच्या दिग्दर्शक एकता मित्तल यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. सामाजिक परिवर्तन आणण्यात माहितीपटांची भूमिका, स्रीकेंद्री कथानकं, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा माहितीपटांवर होणारा परिणाम, ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स इत्यादी विषयांवरची चर्चासत्रं, परिसंवाद आणि कार्यशाळाही आज झाली. हा महोत्सव २१ जूनपर्यंत चालणार आहे.