केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली. भारतीय टपाल विभागाला नफ्यात आणण्यासाठी काही उपाययोजना सादर करत त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा आरखडा शिंदे यांनी सीतारामन यांना सादर केला. टपाल विभागाला नवी झळाळी मिळावी, यासाठी काही योजना आखल्या असून हा विभाग अधिकाधिक डिजीटल करण्यावर भर देणार, असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
देशभरातील टपाल कार्यालयांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणं, टपाल कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचं नूतनीकरण करण्यावर भर देणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. टपाल विभाग भविष्यात अधिक कार्यक्षम करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा राबवण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय टपाल विभागाच्या महसूलात वाढ करण्याची क्षमता आहे. यासाठी पुढील पाच ते सात वर्षांत महसूलात वाढ होण्यासाठी बाजारातील असून त्यासाठी टपाल विभागाचा वाटा तसंच टपाल विभागाची उत्पादनं वाढवणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.