युक्रेन आणि रशियात सुरू असलेलं युद्ध थांबावं यासाठी सौदी अरेबियात जेद्दाह इथं युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान उच्चस्तरीय चर्चेला आज सुरूवात झाली. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, युक्रेनचे अधिकारी आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले आहेत.
काळ्या समुद्राच्या प्रदेशात युद्धविराम व्हावा असा आपला प्रस्ताव असेल, यामुळे जहाजांची ये जा सुरळीत होऊ शकेल अशी माहिती या युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी दिली होती. त्याचवेळी युक्रेनमधील दुर्मीळ खनिज संपत्तीविषयी अमेरिकेसोबत करार करण्यासाठी युक्रेन तयार असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.
अमेरिका हे युद्ध थांबवण्यासाठीचा कोणताही थेट विशिष्ट उपाय सुचवणार नाही, त्याऐवजी युक्रेनचा विचार काय आहे हे आपण जाणून घेऊ अशी प्रतिक्रिया अमेरिकीचे परराष्ट्र मंत्री रुबिनो यांनी बैठकीला रवाना होण्यापूर्वी दिली होती.
दुसरीकडे युक्रेननं नाटोमध्ये सामील होण्यापासून माघार घ्यावी आणि या युद्धात रशियानं ताब्यात घेतलेला प्रदेश रशियाचा असल्याला मान्यता द्यावी या अटींवर आपणही युद्धविरमासाठी तयार असल्याचं रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
दरम्यान या बैठकीला सुरुवात होण्याआधी काल रात्री रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं युक्रेनचे ३३७ ड्रोन पाडत, त्यांचा हल्ला परतावून लावल्याचा दावा रशियानं केला आहे. हे युद्ध सुरु झाल्यापासून युक्रेननं केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता, या हल्ल्यात दोन जण ठार झाले, तर तीन मुलांसह १८ जण जखमी झाले असा दावाही रशियानं केला आहे. युक्रेनच्या पाडलेल्या ड्रोनपैकी १२६ ड्रोन युक्रेन सीमेलगतच्या कुर्स्क प्रदेशात, तर ९१ ड्रोन मॉस्को परिसरात पाडल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
या हल्ल्याबाबत युक्रेन तसंच अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.