संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा काल संपला; त्यामुळे संसदेची दोन्ही सभागृह येत्या 10 मार्चपर्यंत संस्थगित करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यात 31 जानेवारी रोजी अधिवेशनाचा पहिला टप्पा सुरू झाला होता. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 112 टक्के कामकाज झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. तत्पूर्वी वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 बाबतच्या संयुक्त समितीचा अहवाल काल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांच्या गदारोळात सादर करण्यात आला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवीन प्राप्तीकर विधेयक लोकसभेत मांडलं. विद्यमान प्राप्तीकर कायदा सोपा आणि सुटसुटीत करण्यासाठी हे नवीन विधेयक सरकारनं सादर केलं आहे. हे विधेयक संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याची शिफारस सीतारामन यांनी केली. आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समितीनं अहवाल सादर करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सीतरामन यांनी काल राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तरही दिलं. सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसू नये यासाठी सरकार विविध उपाययोजना सुरू ठेवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करणारा आहे, असं त्या म्हणाल्या. प्राप्तीकरातल्या सवलतींचा फायदा केवळ श्रीमंतांना होईल, हा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.