सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे. भारतीय लष्कराचं सैनिकांचं शौर्य, बांधिलकी आणि मातृभूमीची सेवा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. याच दिवशी १९४९मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हातात घेतली होती. या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन साजरा केला जातो.
लष्कर दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्करातले जवान आणि ज्येष्ठ तसंच निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सैनिक देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी योगदान देतात. आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी ते सदैव सज्ज असतात, असं मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनानिमित्त सैन्यातल्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या दृढनिश्चयाच्या बळावर भारतीय लष्कराने सदैव देशाचं संरक्षण केलं आहे. देशावर येणाऱ्या नैसर्गिक संकटांच्या काळातही मदत करण्यासाठी ते तत्पर असतात. भारताच्या सीमांचं रक्षण करून कोट्यवधी भारतीयांना सुरक्षित ठेवणाऱ्या लष्कराप्रति देश सदैव कृतज्ञ आहे, असं मोदी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत. सरकार सैन्य दलांमध्ये विविध सुधारणा तसंच आधुनिकीकरणाला प्राधान्य देत असल्याचंही मोदी म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशातून सैन्यातल्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सैनिकांना दाखवलेल्या शौर्याच्या बळावरच भारतीय लष्कर हे जगातल्या सर्वोत्तम लष्करांपैकी एक ठरलं आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ते देशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात आणि प्रसंगी सर्वोच्च बलिदान देतात, असं म्हणत शहा यांनी देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना अभिवादन केलं आहे.