नाशिक जिल्ह्यातल्या सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लिमीटेड या कंपनीमध्ये युरोपमधल्या रिसपॉन्स अबिलिटी तसंच अमेरिकेतल्या जीईएफ कंपनीनं ३९० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा वापर पेटंटेड द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांचे लागवड क्षेत्र विस्तारण्यासाठी आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. या कंपनीत एफ.एम.ओ., प्रोपॅर्को, इन्कोफिन आणि कोरीस या कंपन्यांनीही गुंतवणूक केलेली आहे.
सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लिमीटेड ही सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या मालकीची उपकंपनी असून ती फळांच्या तसंच भाजीपाल्याच्या पुरवठा साखळीमध्ये कार्यरत आहे. या कंपनीची उत्पादनं ४० हून अधिक देशांमध्ये विकली जातात. शेतकऱ्यांनी स्थापन केलेली ही कंपनी समभागांची विक्री करण्याच्या विचारात असून ती शेअर बाजारात येणारी शेतकऱ्यांची पहिली कंपनी ठरणार आहे.