रशिया आणि युक्रेन युद्धावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला. शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच पाठिंबा असेल. त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचीही आमची तयारी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांनी ही भूमिका मांडली. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं रशियातल्या कझान शहरात त्यांची ही भेट झाली. कझान शहराशी भारताचे जुने संबंध आहेत. इथं भारताचा दुतावास सुरू केल्यानं दोन्ही देशातले संबंध आणखी दृढ होतील, असं प्रधानमंत्री म्हणाले. पुतीन यांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय. ब्रिक्स समुहानं गेल्या १५ वर्षात वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि अनेक देश या समुहात येण्यासाठी इच्छुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
भारत आणि रशियातले संबंध खोलवर रुजलेले आहेत. हे संबंध आणखी बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागिदारी दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर आहे, असंही ते म्हणाले.