रशिया–युक्रेन दरम्यान युध्दबंदी करारासाठी योजना आखण्याच्या उद्देशानं लंडनमध्ये परिषद सुरु आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर झेलेनस्की या बैठकीला उपस्थित आहेत. युक्रेनमध्ये शांतता नांदावी यासाठी चार कलमी रुपरेखा तयार करण्यात आली आहे. ब्रिटन तसंच अन्य युरोपीय देश युक्रेनची साथ देणार आहे. असं ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टामर यांनी सांगितलं.
युद्ध सुरू असताना युक्रेनमध्ये लष्करी मदतीचा प्रवाह सुरू ठेवणं आणि रशियावर आर्थिक दबाव वाढवणं, शाश्वत शांततेसाठी युक्रेनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, शांतता करार झाल्यास, भविष्यात रशियाकडून युक्रेनमध्ये होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला रोखण्यासाठी युरोपीय नेत्यांनी मदत करणं आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘इच्छुक समुहाची युती’ तयार करणं. अशा 4 मुद्यांचा समावेश आहे. यावेळी स्टारमर यांनी एका कराराची घोषणा केली ज्यामुळे युक्रेनला 5 हजारहून अधिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं खरेदी करण्यासाठी एकंदर दिड अब्ज पौंड किमतीचा निर्यात वित्तपुरवठा वापरता येईल.
शिखर बैठकीत जर्मनी, डेन्मार्क, इटली, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, स्पेन, कॅनडा, फिनलंड, स्वीडन, झेक प्रजासत्ताक आणि रोमानियाचे नेते उपस्थित होते. तसंच तुर्कीचे परराष्ट्र मंत्री, नाटोचे सरचिटणीस आणि युरोपियन कमिशन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष देखील उपस्थित होते.