महाविकास आघाडीत कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं.
विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत गांधीभवनात झाली. त्यानंतर पटोले बातमीदारांशी बोलत होते.
आजच्या बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली, तसंच राज्यातल्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जागा वाटपाचा निर्णय गुणवत्तेनुसारच होणार आहे, असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिली आहे, ते समाजातल्या विविध घटकांशी चर्चा करून सर्वसमावेशक जाहीरनामा तयार करतील, असं त्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं महायुतीला धक्का दिला आहे. जनता विसरून जाते असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणत आहेत, पण जनतेच्या विश्वासघाताची किंमत महायुतीला लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही चुकवावी लागेल. राज्यातली जनता त्यांना जागा दाखवून देईल, असं पटोले म्हणाले. आजच्या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, इत्यादी नेते उपस्थित होते.