राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही संच सुरू करण्यात आले असून, दोन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ५६ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रातून ८४ हजार ४४६ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस असून इगतपूरी आणि त्र्यंबकेश्वर येथे अतिवृष्टी झाली होती. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाला आहे. गंगापूर धरणातून काल रात्रीपर्यंत ९ हजार ४५० क्युसेक प्रवाह सुरू होता तो आता १२०४ क्युसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दारणा धरणातून ५ हजार ८४८ तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून ४५ हजार ७६९ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.