राष्ट्रीय चाचणी संस्थेनं नीट युजी- २०२४ परीक्षेचा सुधारित निकाल आज जाहीर केला. भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतल्या वादग्रस्त ठरलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय विचारात घेऊन हा सुधारित निकाल देण्यात आला आहे. या प्रश्नाच्या योग्य उत्तराबाबत निर्णय घेण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी दिली होती. त्या अनुषंगानं स्थापन झालेल्या आय आय टी दिल्लीच्या तज्ञांच्या समितीनं या प्रश्नाच्या चौथ्या पर्यायाची योग्य उत्तर म्हणून निवड केली. नीट युजी परीक्षा रद्द करण्याबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्या असून या परीक्षेच्या अखंडतेला धक्का लागल्याचे सिद्ध करणारे कोणतेही सबळ पुरावे आढळून आले नाहीत, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. विद्यार्थी आपला सुधारित निकाल अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतील.
Site Admin | July 25, 2024 8:25 PM | NEET-UG 2024