मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरच्या प्रणालीत काल झालेला तांत्रिक बिघाड हळूहळू सोडवण्यात येत आहे, मात्र, सर्व यंत्रणा सुरळीत होण्यास आणखी काही वेळ लागेल, असं मायक्रोसॉफ्टची सहयोगी कंपनी क्राउडस्ट्राइकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरच्या प्रणालीत काल तांत्रिक बिघाड झाला आणि जगभरातले व्यवहार ठप्प झाले. या तांत्रिक बिघाडाचा अर्थात आऊटेजचा जगभरातल्या कोट्यवधी वापरकर्त्यांना तसंच बँकिंग सेवा, रुग्णालयं आणि विमान वाहतूक यंत्रणेला सर्वात जास्त फटका बसला. देशातल्याही अनेक विमान कंपन्यांना विमानतळांवर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रियेचा अवलंब करावा लागला.
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्व तज्ज्ञ काम पुन्हा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून ग्राहकांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नारायण नडेला यांनी सांगितलं आहे.
यूएस सायबर-सुरक्षा फर्म क्राउडस्ट्राइकने सदोष सॉफ्टवेअर अपडेट जारी केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टमवर परिणाम झाला आणि जगभरातली अनेक उपकरणं आणि प्रणाली अकार्यक्षम झाली. सुरक्षेसंदर्भातली माहिती गोळा करण्यासाठी अनेक व्यावसायिक संगणकांमधे फाल्कन सेन्सर बसवल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून ती सोडवण्यासाठी अभियंते प्रयत्नशील असल्याचं कंपनीनं सांगितलं. दरम्यान, जागतिक आउटेजबाबत सरकार मायक्रोसॉफ्टशी संपर्कात असून या बिघाडामागचं कारण सापडल्याची माहिती, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. तसंच राष्ट्रीय माहिती केंद्राच्या नेटवर्कवर या बिघाडाचा परिणाम झाला नसल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं आहे.
या पार्श्वभूमीवर विमानतळांवरची एअरलाईन कार्यप्रणाली पूर्ववत झाली असून हवाई वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचं नागरी उड्डाण मंत्रालयानं आज स्पष्ट केलं आहे. सरकारचं विमानतळावरच्या कामकाजावर पूर्ण लक्ष असून विमान कंपन्यांसह प्रवाशांचं नियोजन आणि परतावा यावर देखील पूर्ण नियंत्रण आहे, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.