येत्या रविवारी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य याचं दर्शन घडणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या पथकांचा कसून सराव चालू आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी आज हवाई कसरतीचा सराव केला.
भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष दोन चित्ररथ यंदाच्या संचलनात सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९० जणांचं लष्करी बँड पथक सहभागी होणार आहे. तसंच भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं देशाच्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ३१ चित्ररथ सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी देशभरातून ३४ विविध क्षेत्रातल्या दहा हजार मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे.