येत्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात नवी दिल्लीत होणारं संचलन पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. राष्ट्रासाठी महत्वाच्या उपक्रमांमध्ये जनभागीदारी वाढवण्याच्या उद्देशानं देशभरातून एकूण १० हजार व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे जलदूत, प्राथमिक कृषी पतसंस्थांचे प्रतिनिधी, उत्कृष्ट जल समित्या, स्वयंसहायता गट, कारागीर, विविध योजनांचे लाभार्थी, सरपंच, उत्कृष्ट स्टार्ट अप्स आणि इतर अनेक क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश आहे. यापैकी अनेक जण दिल्लीला पहिल्यांदाच जाणार असून या सोहळ्यासाठी बोलावल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या सोहळ्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या मोहिते दांपत्याला आमंत्रित करण्यात आलं आहे. विश्वास मोहिते हे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे लाभार्थी आहेत.
अकोला शहरातली दोन मुलंही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. आनंद खोडे आणि सुमित पथरोड अशा या मुलांची नावं आहेत. सुमित हा प्रधानमंत्री बँड पथकात जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहे तर आनंद हा राष्ट्रीय छात्रसेनेच्या पथकाचं नेतृत्व करणार आहे. या दोघांचेही वडील अकोला महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात.