डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 23, 2025 9:01 PM | Republic Day 2025

printer

प्रजासत्ताक दिनी करण्यात येणाऱ्या संचलनाचा दिल्लीत सराव

प्रजासत्ताक दिनी करण्यात येणाऱ्या संचलनाचा सराव आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावर करण्यात आला. सरावादरम्यान टी-90 टँक, नाग क्षेपणास्त्र यंत्रणा, आणि पिनाका रॉकेट यंत्रणेने देशाच्या लष्कराच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. विविध सैनिकी तुकड्यांसह विविध राज्यातील चित्ररथांनी सामर्थ्य आणि सांस्कृतिक ऐक्याचं प्रदर्शन केलं. भारतीय हवाई दलाच्या अनेक लढाऊ विमानांनी कर्तव्यपथावर साहसी कसरती केल्या.  विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे २६ चित्ररथ संचलनात सहभागी होणार असून स्वर्णिम भारत – विरासत और विकास ही यंदाची थीम आहे. 

 

युद्धस्थळ टेहळणी यंत्रणा तसंच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रलय शस्त्र यंत्रणेचं प्रदर्शन हे यावेळच्या संचलनाचं मुख्य आकर्षण असेल असं मेजर जनरल सुमित मेहता यांनी सांगितलं. संचलनादरम्यान, भिष्मा टी-90 टँक, नाग क्षेपणास्त्र यंत्रणा, बजरंग लाईट स्पेशलिस्ट व्हेइकल, नंदीघोष जलद प्रतिक्रिया दल वाहन, ब्राह्मोस, अग्नीबाण, पिनाका, आकाश शस्त्र यंत्रणा याद्वारे भारताच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन घडणार आहे. याशिवाय केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि एनसीसीची तुकडीही संचलनात सहभागी होणार आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता संचलनाला सुरुवात होईल आणि ९० मिनिटं संचलन करण्यात येईल.

 

यंदा इंडोनेशियाच्या सैन्यदलाची तुकडीही संचलनात सहभागी होणार आहे. या संचलनात इंडोनेशियन लष्कराचे ३५२ जवान सहभागी होतील. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात मूळच्या बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या देवडी इथल्या फ्लाईंग ऑफीसर दामिनी देशमुख या परेड कमांडर आहेत. त्या ध्वजारोहणानंतर ध्वजावर  पुष्पवृष्टी करणार आहेेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा