डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर  सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन सरकारी कामकाज अधिक गतिमान करता येईल, असं ते म्हणाले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर राज्य पोलीस दल आणि इतर सुरक्षा दलांच्या संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री जो झेकॅक्स, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विविध देशांचे मुंबईतले वाणिज्यदूत आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

विधान भवनात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तिरंगा फडकावला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलाच्या पथकानं राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यात झालेल्या ध्वजवंदनेच्या कार्यक्रमात उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला. 

 

मोहिमांवर असलेल्या नौकांसह वेस्टर्न नेव्हल कमांडच्या सर्व तुकड्यांनीही प्रजासत्ताकदिन साजरा केला.

 

प्रजासत्ताक दिना निमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या आवारातही उपमहासंचालक संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. 

 

राज्यात इतरत्रही मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. विविध जिल्हा मुख्यालयांमधे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा