मोबाइलवर येणारे अनावश्यक कॉल किंवा SMS ची तक्रार ग्राहकांना आता ३ दिवसाऐवजी ७ दिवसापर्यंत करता येणार आहे. ग्राहकानं कॉल किंवा SMS पाठवणारा क्रमांक, याविषयी थोडक्यात माहिती, तारिख यासारखी माहिती दिली तर मोबाइल कंपन्यांना ही तक्रार ग्राह्य धरावी लागेल. आवश्यकता असेल तर या कंपन्यांनी ग्राहकांना अधिक माहिती विचारावी, असं ट्रायनं स्पष्ट केलंय. तक्रार करण्याची सुविधा मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवर ठळक पणे दाखवणे कंपन्यांना बंधनकारक असेल. या तक्रारीवर कंपन्यांना आता ३० ऐवजी ५ दिवसात कारवाई करावी लागेल. रोबोमार्फत होणारे कॉल किंवा आपोपाप केल्या जाणाऱ्या कॉलची माहिती ग्राहकांना देणंही आता बंधनकारक केलंय. त्यामुळं ग्राहकांना होणारा व्यत्यय कमी होईल.
१० आकडी क्रमांकावरुन कंपन्यांना ग्राहकांना मार्केटिंग कॉल करता येणार नाही. त्यासाठी १४० या क्रमांकानं सुरू होणाऱ्या नंबरचाच वापर करावा लागेल. याशिवाय विविध व्यवहार किंवा सेवा पुरवण्यासाठी १६०० या क्रमाकांनं सुरू होणाऱ्या नंबरचा वापर करावा लागेल. वारंवार अनावश्यक कॉल करणाऱ्या क्रमांक सुरुवातीला १५ दिवसांसाठी बंद करावा लागेल. त्यानंतरही अनावश्यक कॉल सुरू राहिले तर वर्षभरासाठी ही बंदी लागू होईल. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी लागेल.
अनावश्यक कॉलची चुकीची आकडेवारी देणाऱ्या कंपन्यांना २ ते ५ लाख रुपये दंड आकारण्याचा इशाराही ट्रायनं दिला आहे.