त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू आहे. काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरलं आहे. राज्यात सध्या ४७१ मदत केंद्र सुरू असून त्यात सुमारे ७० हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. या पुरामुळे त्रिपुरातले रस्ते पूल यांचं नुकसान झालं असून त्रिपुरा राज्य सरकारनं हे नुकसान १ हजार ८२५ कोटी रुपये इतकं असल्याची माहिती दिली आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी विविध सामाजिक आणि खासगी संस्था, डॉक्टर्स तसंच सामान्य लोकांनीही मदत कार्यासाठी देणगी दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिपुरा राज्याला १० कोटी रुपयांची मदत केल्याची माहिती त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी दिली आहे. या पुरामुळे झालेल्या नुकसानाचं मूल्यांकन करण्यासाठी त्रिपुरा सरकारने केंद्र सरकारला पथक पाठवण्याची विनंती केल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहराने कळवलं आहे.
Site Admin | August 27, 2024 1:41 PM | Flood | Tripura