डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्के कपात, आर्थिक वृद्धी दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज

सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात पाव टक्के कपात केली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला. त्यामुळं रेपो दर साडे ६ टक्क्यावरुन सव्वा ६ टक्के झाल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. या समितीच्या निर्णयांविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धीदरांचा अंदाजही खाली आणला. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या बैठकीनंतर, हा दर ६ पूर्णांक ६ टक्के राहण्याची शक्यता पतधोरण आढावा समितीनं वर्तवली होती.

 

आगामी आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धीदराचा अंदाजही ६ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांवरुन ६ पूर्णांक ७ दशांश टक्के, इतका कमी केला आहे. चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ४ पूर्णांक ८ दशांश टक्के, तर आणि पुढच्या आर्थिक वर्षात ४ पूर्णांक २ टक्के राहिल, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. बँकांमधले घोटाळे कमी करण्यासाठी बँकांच्या वेबसाइटच्या नावात bank.in लावण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. एप्रिलपासून याची सुरुवात होईल. त्यानंतर वित्तीय क्षेत्रातल्या इतर संस्थांच्या वेबसाइटच्या नावात ‘fin.in’ असा वापर केला जाईल. २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या वित्तीय साक्षरता आठवड्याचा भर आर्थिक निर्णय घेण्यातली आणि घरखर्चातली महिलांची भूमिका सक्षम करण्यावर असेल, असंही रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलंय. रिझर्व्ह बँकेच्या या पतधोरणाचं बँकिंग उद्योगानं स्वागत केलंय. बांधकाम उद्योजकांची संघटना असलेल्या क्रेडाईनं आणखी व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा