महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार 704 मतदार असून, वयाची शंभरी पूर्ण केलेले 47 हजार 392 मतदार आहेत; अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.
या निवडणुकीसाठी राज्यातल्या 288 मतदारसंघांमधून एकंदर 7 हजार 994 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, 7 हजार 73 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, 921 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, दिवाळी नंतर राज्यात निवडणूक प्रचाराला वेग येणार असून, विविध राजकीय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
अनेक दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री राज्यात प्रचारासाठी येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 8 नोव्हेंबरला धुळ्यात प्रचारसभा होत असून, ते जळगाव आणि मालेगावमधील जाहीर सभेला संबोधित करतील. कॉँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील 6 नोव्हेंबर रोजी राज्यात प्रचार दौऱ्यावर येणार आहेत. ते नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील असं कॉँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.