राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत.
राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला असून, १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागानं कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कुलाबा वेधशाळेनं रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मुंबई शहर भागात काल ८२ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ९६ तर पश्चिम उपनगरात ९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आजही पाऊस कायम असल्यानं मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सलग सुरू असलेल्या पावसानं आज थोडीशी उसंत घेतली. नद्यांची पाणीपातळीही आता ओसरू लागली असून, दुपारी खेडमधली जगबुडी आणि राजापुरातली कोदवली या दोनच नद्या इशारा पातळीवरून वाहत होत्या.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस असून कोणत्याही भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या मदतीसाठी NDRF ची 21 जणांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात तापी नदीवरच्या हतनूर धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढली असून धरणातून ४ हजार २३८ क्यूसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातले ८१ बंधारे पाण्याखाली गेले असून दीडशेहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातल्या ओपारा गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
नाशिक जिल्ह्यात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नसल्यानं अनेक ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येत आहे.