डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रायगड आणि सातारा तसंच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांच्यातल्या समन्वयाअभावी कालची पूरपरिस्थिती उद्भवली. यापुढे प्रशासन तसंच अधिकाऱ्यांनी ही काळजी घ्यावी, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

 

मुसळधार पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज आणि उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या उर्वरित परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या आज सकाळी तसंच दुपारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 

सांगली भागातली पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय तसंच अभियांत्रिकी कर्मचाऱ्यासह शंभर जणांचं लष्करी पथक तैनात केलं आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने सांगली मिरजसह अनेक भागातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या कोयनेतून ३२ हजार १०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. जिल्ह्यातल्या काही रस्त्यांवरुन वाहतूक बंद केली आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्यातल्या राधानगरी, दुधगंगा, वारणा आणि तुळशी या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. प्रशासनाने शाळा तसंच महाविद्यालयांना उद्याही सुटी जाहीर केली आहे.

 

नंदूरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात झालेल्या पावसानं सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग प्रभावित झाला आहे. त्यामुळं या मार्गावरच्या काही गाड्यांचे मार्ग बदलले असून उधना-नंदूरबार मेमो रद्द झाली आहे.

 

रायगड जिल्ह्यात खवळलेल्या समुद्रामुळे अलिबागजवळ अडकलेल्या मालवाहू जहाजावरून चौदा कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली. नंदुरबार जिल्ह्यात रंगावली, नेसू तसंच सरपणी नद्यांना पूर आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा