भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापलं आहे प्रधानमंत्री म्हणाले. जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे, याविषयीची देशो देशीची उदाहरणंही त्यांनी आजच्या मन की बात मधून श्रोत्यांसमोर मांडली.
हिवाळ्याच्या मोसमात देशभरात खेळ आणि तंदुरुस्ती विषयक राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक या अभिनव स्पर्धेची माहिती देताना ते म्हणाले की या स्पर्धा म्हणजे विकास आणि खेळाचा संगम असून, युवा प्रतिभेचा आविष्कार आहे. खिलाडूवृत्ती ही समाजाला जोडण्याचं एक सशक्त माध्यम असल्याचंही ते म्हणाले.
आरोग्य क्षेत्रात भारतानं मिळवलेल्या यशाचा उल्लेख करताना त्यांनी मलेरिया विरोधातल्या लढ्याची देशाची कामगिरी श्रोत्यांसमोर मांडली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात २०१५ ते २०२३ या काळात मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ८० टक्के इतकी घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. देशवासियांनी एकत्रितपणे निर्धारानं या आव्हानाचा सामना केल्यानंच हे यश मिळाल्याचं ते म्हणाले.
कर्करोगा विरोधातल्या लढाईत आयुष्मान भारत योजना मोठी भूमिका पार पाडत असून, त्यामुळे ९० टक्के रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागले असल्याचंही त्यांनी सांगितलं. जगप्रसिद्ध लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकात भारतात कर्करोगावर वेळच्या वेळी उपचार होण्याची शक्यता वाढली असल्याचं नमूद केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. कर्करोग आणि त्याच्या लक्षणांप्रती जागरूकता, वेळेवर तपासणी आणि उपचारांसारखी कृती, रुग्णांसाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याची हमी या अनुषंगानं जागरूकता, कृती आणि हमी हा कर्करोगाविरोधातल्या लढ्याचा मंत्र असल्याचं ते म्हणाले.