देशात २०२३-२४ या वर्षात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २५ लाख मेट्रिक टनांनी वाढून ३३२२ लाख मेट्रिक टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं २०२३-२४ साठी विविध महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनाचे अंतिम अंदाज जाहीर केले आहेत.
सरत्या वर्षात भात, गहू आणि श्री अन्न यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन विक्रमी झाल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्राथमिक अंदाज करण्यात आल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
भाताचं एकंदर उत्पादन २०२२-२३ च्या तुलनेत २१ लाख मेट्रिक टनांनी वाढून १३७८ लाख मेट्रिक टन इतकं झाल्याचा अंदाज आहे. गहू आणि श्री अन्नाच्याही उत्पादनाचा विक्रम झाला आहे. गव्हाचं उत्पादन ११३२ लाख मेट्रिक टन, तर श्री अन्नाचं उत्पादन १७५ लाख मेट्रिक टन इतकं झाल्याचा अंदाज आहे.