वस्तु आणि सेवा कर परिषदेनं पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के वस्तु आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या एकसमान दराची शिफारस केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या ५३व्या वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना, रेल्वे फलाट तिकिटं, विश्राम कक्ष आणि प्रतीक्षा कक्षाच्या सुविधांसाह भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा तसच बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांवर कोणताही जीएसटी लागणार नाही अशी घोषणा केली. विविध प्रकारच्या पुट्ठ्यांच्या खोक्यावर 12 टक्के एकसमान जीएसटी दराची शिफारस परिषदेनं केली आहे हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या सफरचंद उत्पादकांना याचा फायदा होईल असं सीतारामन यांनी सांगितलं. बायोमेट्रिक-आधारित आधार प्रमाणीकरण अखिल भारतीय आधारावर लागू केलं जाणार असून खोट्या इनव्हॉइसद्वारे केलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या दाव्यांना आळा घालण्यात याची मदत होईल अशी अपेक्षा असल्याचं त्या म्हणाल्या. लहान करदात्यांच्या सुविधेसाठी GSTR-4 फॉर्ममध्ये तपशील आणि रिटर्न सादर करण्यासाठीची मुदत 30 एप्रिल वरुन 30 जून पर्यंत वाढवण्याची शिफारसही परिषदेनं केली आहे.
Site Admin | June 23, 2024 10:12 AM | GST | जीएसटी | निर्मला सीतारामन | वस्तु आणि सेवा कर परिषद