लघुकालीन नफ्याच्या मागे धावताना नागरिकांनी दीर्घकालीन वित्तीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम. नागेश्वर राव यांनी दिला आहे. मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात आयोजित आर्थिक परिषदेत ते बोलत होते. नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्यानं या गोष्टी होतात.
आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँक इतर वित्तीय नियामकांसोबत काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.बँका आणि वित्तीय संस्थांनी डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली नाही, ग्राहककेंद्री भूमिका घेतली नाही आणि डेटाच्या आधारे निर्णय घेतले नाही तर त्या कालबाह्य होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. बाहेरुन विकत घेतलं जाणारं तंत्रज्ञान विकत घेताना नियामकांचे दिशानिर्देश आणि ग्राहकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याचा इशारा त्यांनी दिला.