रिझर्व्ह बँकेनं आज मुंबईतल्या न्यू इंडिया सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं. प्रशासनाचा दर्जा खालावल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया सहकारी बँकेवर काल विविध निर्बंध लागू केले होते. त्यानुसार बँकेला पुढले सहा महिने नवीन कर्ज देता येणार नाही तसंच बचत खातं, चालू खातं किंवा ठेवीदाराच्या इतर कुठल्याही खात्यातून रक्कम काढता येणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत, यांची बँकेच्या कारभाराचं व्यवस्थापन करण्यासाठी ‘प्रशासक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, बँकेचं संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी बरखास्त करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या विविध शाखांमध्ये आज ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. बँकेच्या एकूण २८ शाखा असून, सर्व शाखा मुंबईत आहेत.