रिझर्व्ह बॅंक ही देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ असून भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्धापनदिनाचा सांगता सोहळा काल मुंबईत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला; त्यावेळी त्या बोलत होत्या.
सामान्य नागरिकांचा भारतीय रिझर्व्ह बँकेवरचा विश्वास हेच रिझर्व्ह बँकेचं गेल्या नऊ दशकातलं सर्वात मोठं यश आहे, असं त्या म्हणाल्या. विकसित भारताच्या दिशेने पुढे जात असताना, अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आगामी दशक अतिशय महत्त्वाचं असून आर्थिक समावेशन, ग्राहक सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक वचनबद्ध आहे, अशी ग्वाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वागतपर संबोधनात दिली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपस्थित होते.