पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन संसदीय व्यवहार आणि अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजीजू यांनी केलं आहे.
काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, रिजीजू यांनी मणिपूरमधील काही घटना वगळता संपूर्ण ईशान्य भारतात शांतता असल्याचं रिजीजू म्हणाले. काँग्रेसनं ईशान्य भागाच्या विकासासाठी ठोस काम केलं नसल्याचा आरोप करत, केंद्रात मोदींची सत्ता आल्यापासून दहा हजारांहून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचंही रिजीजू यांनी सांगितलं. दरम्यान, रिजीजू आज पुणे दौऱ्यावर येणार असून, संगमवाडी इथल्या लहुजी साळवे स्मारकाला ते भेट देतील.
त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद ते साधणार आहेत. तसंच दलित चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी तसंच बार्टीमधल्या राज्यसेवा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.