रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नाशिक इथं झालेल्या सामन्यात आज महाराष्ट्रानं बडोद्यावर ४३९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्रानं पहिल्या डावात, २९७ धावा केल्या होत्या, तर बडोद्यानं १४५ धावा केल्या. दुसऱ्या डावात ७ बाद ४६४ धावांवर महाराष्ट्रानं आज आपला डाव घोषित केला. सौरभ नवलेनं नाबाद १२६ धावा केल्या. रामकृष्ण घोषचं शतक थोडक्यात हुकलं. त्यानं ९९ धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडनं ८९ धावांचं योगदान दिलं.
महाराष्ट्राच्या पहिल्या डावातल्या आघाडीमुळे बडोद्यापुढं विजयासाठी ६१६ धावांचं आव्हान होतं. ते बडोद्याला पेलता आलं नाही. अजीत शेठनं सर्वाधिक ५१, तर ज्योत्स्नील सिंगनं ४० धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे बडोद्याचा दुसरा डाव १७७ धावात आटोपला. महाराष्ट्रातर्फे मुकेश चौधरीनं ५, रजनीश गुरबानीनं ३, तर रामकृष्ण घोषनं २ गडी बाद केले.
पहिल्या डावात ८३ तर दुसऱ्या डावात नाबाद १२६ धावा करणारा, तसंच दोन्ही डावात मिळून पाच झेल घेणारा सौरभ नवले सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू ठरला.