विदर्भ क्रिकेट संघानं आज रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा आपल्या नावे केलं. नागपूर इथं विदर्भ आणि केरळ यांच्यात झालेला अंतिम सामना आज अनिर्णित राहिला. मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या ३७ धावांच्या आघाडीच्या जोरावर जेतेपदाला गवसणी घातली.
आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी विदर्भाच्या दुसऱ्या डावात ९ बाद ३७५ धावा झाल्या असताना, दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्यावर सहमती दर्शवली.
या सामन्यात पहिल्या डावात १५३, आणि दुसऱ्या डावात ७३ धावांची खेळी केलेल्या विदर्भच्या दानीश मालेवार सामनावीर ठरला..
विदर्भाच्याच हर्ष दुबे याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी स्पर्धेतल्या सर्वोकृष्ट खेळाडुच्या किताबानं गौरवलं गेलं. त्यानं यंदाच्या रणजी हंगामात ६९ बळी टिपत, बिहारच्या आशुतोष अमन याचा एकाच हंगामातला सर्वाधिक ६८ बळींचा विक्रम मागे टाकला. यासोबतच त्यानं १० सामन्यांमध्ये पाच अर्धशतकांसह ४७६ धावाही काढल्या.
रणजी स्पर्धेचं जेतेपद पटकावल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या संघाचं अभिनंदन केलं आहे.