रंगपंचमीचा सण आज राज्यात उत्साहाने साजरा झाला. ठिकठिकाणी मंदिरांमधे देवमूर्तींना रंग लावण्यात आला, तर जागोजाग तरुणाईने रंग खेळण्याचा आनंद लुटला. नाशिकच्या पारंपरिक रंगोत्सवासाठी शहरात सात ठिकाणच्या पेशवेकालीन रहाडी म्हणजेच हौद खुले करण्यात आले. शहराच्या मध्य भागातल्या राहाडीमध्ये उत्सव साजरा झाला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अनेक ठिकाणी भेट देऊन रहाडींचे औपचारिक पूजनही केले.
अहिल्यानगर जिल्ह्यात मढी इथं नाथ संप्रदायातल्या संत कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. रंगपंचमी हा नाथांचा समाधी दिन. या दिवशी मढी इथं मोठी यात्रा भरते. संपूर्ण गाभारा आकर्षक फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने उजळून निघाला.
सोलापूर शहर आणि परिसरात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून रंगगाडा मिरवणूक काढण्यात आली. रंग पंचमीसाठी बहुसंख्य बाजारपेठा बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.