राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तेवर आल्यानंतर देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेला जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांच्या रांगेत नेऊन बसवलं, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. रालोआ सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे, या लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना गोयल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात महागाई दर गगनाला भिडल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ४ पूर्णांक ४ दशांश टक्क्यापर्यंत खाली घसरला होता, असंही गोयल म्हणाले. यूपीएच्या काळात देशात मोठी वित्तीय तूट निर्माण झाली होती, परकीय चलनसाठा मर्यादित होता, भ्रष्टाचार बोकाळला होता, मात्र आता जगाच्या आर्थिक विकासाचं नेतृत्व म्हणून जग भारताकडे आशेनं बघत असल्याचं गोयल यांनी सांगितलं.