डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 19, 2024 7:12 PM | Raksha Bandhan

printer

देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह

राज्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहानं साजरा होत आहे. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध रंग आणि आकाराच्या राख्यांबरोबरच सामाजिक सद्भावनेचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या राख्याही वापरल्या जात आहेत. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी आज रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित केले.

रक्षाबंधनानिमिमत्त विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पालघर जिल्ह्यातल्या ‘सेवा विवेक’ ग्राम विकास केंद्रामधल्या, आदिवासी बांबू महिला कारागिरांनी राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली पर्यावरण स्नेही राखी बांधली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. राज्यभरातून सुमारे एक हजार महिला आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून १ कोटी ४० लाख अर्ज आले. त्यातल्या १ कोटी ४ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित महिलांशी संवाद साधला. राज्याची आर्थिक ताकद वाढत जाईल तसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतली निधीची रक्कम वाढवण्याचा मानस असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उमेद अभियानातल्या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील विविध ठिकाणी आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात सहभागी झाले होते. 

देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या वीर जवानांसाठी नंदुरबारच्या आदिवासी भागात राहणाऱ्या शालेय विद्यार्थिनींनी टपालानं राख्या पाठवल्या. टाकाऊ पदार्थांपासून आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींनी स्वतः या राख्या तयार केल्या आहेत. 

सांगलीच्या सुंदर नगर इथं रक्षाबंधन सोहळ्यात महापालिका आयुक्तांना सेक्स वर्कर महिलांनी  राख्या बांधल्या. 

नागपूरच्या विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. टाकाऊ पदार्थांपासून राख्या तयार करण्याची स्पर्धा यावेळी आयोजित करण्यात आली होती. 

  रक्षाबंधनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज शालेय विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा