दिल्लीतल्या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राज्यसभेत आज अल्पकालीन चर्चा झाली. भाजपाचे डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी चर्चेला सुरुवात केली. अक्षम्य निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, रेल्वे अपघात, मणिपूरमधला हिंसाचार, नीट परीक्षा इत्यादी विषयांवर चर्चा करण्याची परवानगी सभागृहाने का दिली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणातल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र दिल्लीत बेसुमार वाढत असल्याचं मत आम आदमी पक्षाच्या स्वाती मलिवाल यांनी मांडलं. याशिवाय शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन इत्यादी खासदारांनी या चर्चेत सहभाग घेतला.
Site Admin | July 29, 2024 7:05 PM | राज्यसभा | लोकसभा