डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 18, 2024 3:32 PM | Loksabha | Rajyasabha

printer

दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरुन गदारोळ झाल्याने आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी आज प्रचंड गदारोळ केला. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर लगेचच काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी शहा यांचा निषेध करणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केली.   

 

संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सत्ताधारी सदस्यांनी त्याला हरकत घेतली. उलट काँग्रेसनेच कायम बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असा आरोप मेघवाल यांनी केला. केवळ राजनैतिक गरज म्हणून काँग्रेसला डॉ. आंबेडकरांबद्दल आदर व्यक्त करावा लागला असं ते म्हणाले. दोन्ही बाजूंनी घोषणा सुरु राहिल्याने सभापती ओम बिरला यांनी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. नंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 

 

राज्यसभेतही काँग्रेस, द्रमुक, राजद, आमआदमी पार्टी आणि इतर विरोधी सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांसाठीच अतिशय आदरणीय आहेत असं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की काल अमित शहा डॉ. आंबेडकरांबाबत अतीव आदरानेच बोलले होते.  मात्र काँग्रेसने डॉ आंबेडकरांच्या हयातीत आणि नंतरही त्यांची अवहेलना केली, लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचं कारस्थान केलं असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला असं ते म्हणाले. गदारोळ चालूच राहिल्याने अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. नंतरही गदारोळ चालूच राहीला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा