अदानी लाचखोरी आणि अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या बरोबरच्या काँग्रेस नेत्यांच्या संबंधांवर झालेल्या आरोपप्रत्यारोपामुळे राज्यसभेचं कामकाज आज आधी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दोन वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी सुुरु झाली. गोंधळातच कामकाज सुुरु ठेवण्याचा प्रयत्न अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या कडून सुरु होता तरीही गोंधळ सुरुच राहिला.
जनता दलाचे खासदार एचडी देवेगौडा यांनी विरोधी पक्षानं दिलेल्या अविश्वास ठरावावर टीका केली. विरोधी पक्षांनी कामकाज सुुरु राहण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जन खरगे यांनी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावर पक्षपाती पणाचा आरोप केला. सत्ताधारी सदस्य काँग्रेसवर विनाकारण आरोप करत असल्याचंही ते म्हणाले. त्यावर राज्यसभेतला गोंधळ अधिक वाढला आणि अखेर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आलं.