संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आजही राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर गदारोळ होऊन सभागृहाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. अध्यक्ष जगदीप धनखड यांनी त्यांच्यावरचा अविश्वास ठराव फेटाळून लावला. काँग्रेसनं अध्यक्षपदाचा अनादर केला असून त्यासाठी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. जे पी नड्डा यांनी सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस यांच्यातल्या संबंधांचा मुद्दा मांडत यावर चर्चा घेण्याची मागणी केली. हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा असल्याचं ते म्हणाले.
लोकसभेतही आज सत्ताधारी पक्षानं या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. परदेशी शक्तींशी हातमिळवणी करून भारताची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केला. त्यावर गदारोळ होऊन कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं.