राज्यसभेत चर्चेला सुरुवात करताना भाजपा खासदार किरण चौधरी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलल्याचं प्रतिपादन केलं. कृषी क्षेत्रासाठी सरकारने प्रयत्न केल्यानंतरही विरोधी पक्ष सरकारविरुद्ध खोटा प्रचार करत असल्याची टीकाही चौधरी यांनी केली.
राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेवेळी बेरोजगारी, महागाई आणि रुपयाची घसरण हे मुद्दे यावेळी उपस्थित केले. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळतील, असं आश्वासन सरकारने दिलं होतं, मात्र, अद्यापही ते पूर्ण झालेलं नाही. विविध सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदं आहेत, मात्र ती भरलेली नाहीत, अशी टीका खरगे यांनी यावेळी केली. तसंच, अनुसूचित जाती आणि जमातींवरच्या कथित अत्याचारांचा मुद्दाही खरगे यांनी राज्यसभेत उपस्थित केला.