राज्यसभेत आज अर्थसंकल्पावरची चर्चा सुरू झाली. विद्यमान सरकारच्या काळात देशाचा आर्थिक विकास दर घसरला आहे, असा आरोप माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांनी केला. बेरोजगारीबद्दलची निश्चित आकडेवारी सरकारनं दिली नसल्याची टीका त्यांनी केली. सध्या तरुणांमध्ये १० टक्के तर पदवीधरांमध्ये १३ टक्के बेरोजगारी दर आहे, मात्र सरकारनं देशात निव्वळ ३ पूर्णांक २ दशांश टक्के बेरोजगारी असल्याचं म्हटलं आहे, असा आरोप चिदंबरम यांनी केला.
या आरोपांना उत्तर देताना सभागृहाचे नेते जे पी नड्डा यांनी सरकारनं योजलेल्या विविध उपायांचा उल्लेख केला. हा अर्थसंकल्प राष्ट्रीय विचारांचा आणि सर्वसमावेशक असल्याचं भाजपा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. देशातल्या सर्व क्षेत्रांना विशेषतः मध्यमवर्गाला यातल्या निर्णयांचा मोठा फायदा होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.